मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतही गवळी या हजर झाल्या नाही. त्यांनी ईडीकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे.
भावना गवळी यांना आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, गवळी यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी आपल्याला १५ दिवसांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी गवळी यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे केली आहे. समन्स वेळेवर न मिळाल्याचं कारण सांगत त्यांनी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला आहे. १५ दिवसांनी चौकशीला हजर राहण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
दरम्यान, भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा केला.
भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.