मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली आहे. सात तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा यांना अँटिलियाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती केली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात आल्या. एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचं नाव आल्याने एनआयएने आजची कारवाई केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. लोणावळ्यातील मोठ्या रिसॉर्टमधून प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.
प्रदीप शर्मा यांची याआधीही एनआयएनं सविस्तर चौकशी केली होती. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ७ आणि ८ एप्रिल रोजी एनआयएनं प्रदीप शर्मा यांची दीर्घकाळ चौकशी केली. यावेळी त्यांनी शर्मा यांचे जुने सहकारी सचिन वाझे यांना देखील त्यांच्यासमोर आणून चौकशी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, यावेळी प्रदीप शर्मा यांच्या अटकेची शक्यता वर्तवली गेली असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती. पण गुरुवारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर दुपारी एनआयएनं त्यांना अखेर अटक केली आहे.