नागपूर (वृत्तसंस्था) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना वाढीव वीज सवलतीची घोषणा करायला लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोंडघशी पाडले. आपल्याला बदनाम करणाऱ्या सरकारमध्ये नितीन राऊत यांनी राहू नये, असा सल्ला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रपरिषदेत दिला.
वीज ग्राहकांना शंभर युनिटपर्यंत मोफत देण्याची घोषणाही सरकारने करायला लावली. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार डॉ. राऊत यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारनेच सुरुवातीला १०० युनिट वीज बिल माफ करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला नाही. दिलेल्या एकाही वचनाची पूर्ती या सरकारने केली नाही. उलट आता ९५ लाख लोकांची वीज कापायला निघाले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे सामाजिक चळवळीतून आलेले नेतृत्व आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी डॉ. नितीन राऊत यांची पाठराखण केली. मनसेच्या आदाेलनात भाजप वीज बिलाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन करताना भाजपसुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात असेल, अशी घोषणा बावनकुळे यांनी या वेळी केली.