मुंबई (वृत्तसंस्था) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबतची राज्यभरातील २५ संघटनांची ऑनलाइन सुरू असलेली बैठक फिस्कटली. ऐन दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी २५ कामगार संघटनांशी ऑनलाइन बैठक घेतली होती.
संघटनांनी कामगारांना सानुग्र अनुदान आणि पगारवाढीचा दुसरा हफ्ता देण्याची मागणी केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महानिर्मिती, महापारेषन आणि महावितरण यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा ऊर्जामंत्र्यांची राज्यभरातील २५ कामगार संघटनांशी ऑनलाइन बैठक होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली असली तरी संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर संप होणार नसल्याचा विश्वास आहे. सरकारला वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीची जाणीव आहे. मात्र, सध्या त्यांच्या मागण्या पूर्ण करता येणार नाही, असे मत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीच्या दिवशी तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांसोबत चर्चा झाली असून ते संपाचा हत्यार उगारणार नसल्याचा विश्वास असल्याचे राऊत म्हणाले.
सरकारला कर्मचाऱ्यांच्या अडचणींची जाणीव असून सरकार त्यांच्या गांभीर्याने विचार करेल, अशी हमी त्यांनी दिली. संपामुळे दिवाळीला काळोख होईल ही भीती अनाठायी असून दिवाळीच्या दिवशी २४ तास वीज पुरवठा देऊ असा दावाही राऊत यांनी केला आहे. वाढीव वीज बिलाबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन खुद्द ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु हे आश्वासन आता हवेत विरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
















