एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळकोठा येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून चाळीसगाव येथे घरी परत जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एरंडोलपासून जवळच १६ रोजी घडली.
चाळीसगाव येथील अविनाश विजयसिंग पाटील (वय ५८) व मीनाबाई अविनाश पाटील (वय ५२) हे दांम्पत्य पिंपळकोठा येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी आले होते. तेथे हजेरी लावून अॅक्टिवाने चाळीसगावकडे परत जात असताना ट्रकच्या धडकेत दोघे जण जागीच गतप्राण झाले, ही दुर्घटना एरंडोलपासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर न्यू इंग्लिश मीडियम स्कूलनजीक सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. मृत अविनाश पाटील हे चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. दरम्यान. चाळीसगाव येथील अविनाश पाटील व मीनाबाई पाटील हे अॅक्टीव्हा (एमएच १९, इइ- ४७१७) ने पिंपळकोठा येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला १६ ऑगस्ट रोजी आले होते.
अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दांम्पत्य घराकडे परत जात असताना शहरापासून जवळच असलेल्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर ट्रक (एमएच १८, बीजी- १०६६) ने त्यांच्या मोपेडला जबर धडक दिली. त्यात मीनाबाई व अविनाश पाटील या दोघांचो जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्याचे पाहून शेतांमधील काम करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व एरंडोल पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती कळवली. त्यानंतर पो.उ.नि. शरद बागल, हे.कॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे तत्काळ अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.