अमरावती (वृत्तसंस्था) वरुड तालुक्यातील जामगाव खडका येथील एका नियोजित नवरदेवावर बोहल्यावर चढण्यापूर्वीच क्रुर काळाने घाला घातला. हळद लागल्यानंतर लग्नाची धावपळ सुरु असतांना नवरदेवाची अचानक तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तो वाचू शकला नाही. त्यामुळे अवघ्या काही मिनिटापूर्वी आनंदाने बहरलेला दारातील मांडव दुःखात बुडाला. दिगंबर ऊर्फ गजानन बाबूराव निंभोरकर (३०, रा. जामगाव खडका), असे मृत वराचे आहे.
मंगळवारी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथील श्री दादाजी दरबार येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. आर्वी (जि. वर्धा) तालुक्यातील एका तरुणीशी त्याचा विवाह होणार होता. कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न असल्याने पाहुण्यांसह सर्वच नातेवाईक, मित्रमंडळी वरमंडपी पोहोचले होते. ठरल्याप्रमाणे रविवारी गजाननला हळद लागली. त्यानंतर मात्र, दिगंबरची अचानक प्रकृती बिघडली. यानंतर उपचाराकरिता त्याला मोर्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अधिक खालावल्याने गजाननला तात्काळ अमरावती येथील पीडीएमसीमध्ये हलविण्यात आले. परंतू नियतीच्या मनात क्रूर खेळ सुरु होता.
गजाननचा उपचारादरम्यान रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ज्या घरात अवघ्या काही तासांपूर्वी सगळी आनंद होता. त्याच घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे जामगावात शोककळा पसरली. दिगंबरचा मृतदेह गावात आणताच आई-वडिलांसह कुटुंबियांचा आक्रोश काळीज चिरणारा होता. यावेळी हृदयद्रावक दृश्यबघून ग्रामस्थांनाही अश्रू आवरता आले नाहीत. दरम्यान, गजाननच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने घटल्याने त्याला अस्वस्थ झाल्याचे प्राथमिक निदान झाल्याचे कळते. परंतू त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाहीय. या बाबतचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केला आहे.