नांदेड (वृत्तसंस्था) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. २ वेळा अतिवृष्टी झाली, पण अजूनही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही, शेतविम्याचे पैसे दिलेले नाहीत. काही झालं की फक्त केंद सरकारकडे बोट दाखवायचं. यांना बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्र सरकारचा हात आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक सध्या होत आहे. या निवडणुकीच्या रिंगात भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडीमधील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यामध्ये ते खात आहेत. यामुळे सामान्य लोकांची अवस्था वाईट झालेली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे, मात्र सरकारने त्यांना रुपयांची मदत केलेली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. मात्र यांचे पैसे मिळत नाहीत. अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम देखील मिळालेली नाही. हे इतके लबाड आहेत की काहीही झाले तरी केंद्रावर ढकलतात. बायकोने मारले तरी केंद्रानेच मारले असे ते सांगतील, अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.