नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पार्टीमध्ये सारे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपमध्येही सर्वोच्च नेतृत्वावर प्रचंड नाराजी असून, मोदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच ही बाब उघड केली आहे. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही मतभेद असल्याचा दावा या मंत्र्याने केला आहे.
त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी काही योजनांबाबत भूमिका मांडली होती. ती फेटाळताना मोदींनी दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यावेळी हिम्मत असेल, तर मला मंत्रिमंडळातून काढून दाखवा, अशी मी मोदींना थेट धमकी दिली होती. माझ्यासोबत २५२ खासदार असून, कोणत्याही क्षणी मोदी सरकार पाडण्याचे सामर्थ असल्याचा दावाही या मंत्र्याने केला आहे. मोदी आणि अमित शहांमध्येही सारे काही ठीक नसल्याचे संकेतही त्यांनी या चर्चेतून दिले. मोदी आत्मप्रेमात मग्न आहेत. संसदेत आपल्या भाषणावर कोणी किती टाळ्या वाजविल्या, हे मोदी स्वत: च्या चेंबरमध्ये बसून मोजत असल्याचेही या मंत्र्याने सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज यांना योगी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यापासून मोदींनी रोखले होते, असा खळबळजनक गोप्यस्फोटही या मंत्र्याने केला आहे. राजनाथ सिंह हे आतापर्यंत मोदींशी वाद घालत होते. मात्र, त्यांनीही आता शस्त्रे म्यान केली आहेत, असे या मंत्र्याने सांगितले.