मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक विकासकामांना निधी मिळत नसल्याचे चित्र एकीकडे असताना, दुसरीकडे मंत्र्याची मंत्रालयातील दालने आणि त्यांच्या बंगल्यावर गेल्या वर्षभरात तब्बल ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्य आर्थिक संकटात असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक केले जातायत. यासाठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात असे दिसून आलं. यावरुन विरोधी पक्ष भाजपने सरकारवर निशाणा साधला. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख इतका सर्वाधिक खर्च झाला आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर ३ कोटी २६ लाख इतका खर्च झाला. कोरोना काळात राज्यावर आर्थिक ताण असताना जनतेच्या कराच्या पैशांतून अशाप्रकारची हौस पूर्ण करणं योग्य आहे का ? असा प्रश्न विचारला जातोय. शेवटी सरकार कोणाचेही असो चूक ही चूक आहे. अशाप्रकारच्या खर्चांमध्ये ताळमेळ असावा. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असे खर्च दुर्लक्षित होतात. हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च होऊ नये यासाठी भाजप भूमिका घेईल. हा खर्च जनतेच्या पैशातून होतो. कोणाच्यातरी सांगण्यावरुन खर्च होतो असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. सरकारकडून यावर अद्याप कोणते स्पष्टीकरण आले नाही.