नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘जो कोणी यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटलं जाईल, मग ते राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत का असेनात’ असं म्हणतानाच राहुल गांधी यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत.
दरम्यान याआधी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. फक्त तीनच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. भेटीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आज राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. सामूहिक मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक निवेदन सोपवलं. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचाही या निवेदनात समावेश करण्यात आला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. “कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला. पुढे ते म्हणाले की, “भाजपा आणि नरेंद्र मोदींचं एकच ध्येय असून ते शेतकरी आणि मजुरांना कळलं आहे. आपल्या आसपास जे दोन चार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी पैसे उभं करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे”.
“जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
















