पारोळा (प्रतिनिधी) येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची ५ रोजी छाननी झाली. या चार अर्जावर हरकत घेतली होती. त्यावर आज निकाल देण्यात आला असून माजी पालकमंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील यांचे दोन्ही अर्ज नामंजूर केल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे. तर माजी सभापती अमोल पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती रेखा सतीश पाटील यांचे अर्ज मात्र मंजूर झाले आहेत. डॉ. पाटील यांचा अर्ज नामंजूर झाल्याने महाविकास आघाडीची भिस्त आता रेखा पाटील यांच्या उमेदवारीवर आहे.
शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील यांच्या गटाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट हे तिन्ही गट मिळून डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत १८ जागांकरिता तब्बल १६० नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. या दाखल अर्जामध्ये माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी विविध कार्यकारी मतदार संघात सर्वसाधारण प्रवर्गातून तर ओबीसी मतदार संघातून अशा दोन मतदार संघात नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्या दोन्ही नामनिर्देशन पत्रांवर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. दिनकर पाटील यांनी हरकत घेतली होती.
व्यापारी मतदार संघातील मतदाराला विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवता येत नाही हा हरकतीत मुद्दा होता. तो मान्य झाल्याने डॉ. सतीश पाटील यांचे दोन्ही अर्ज त्यांनी नामंजूर झाले तर दुसरीकडे अमोल पाटील आणि रेखा सतीश पाटील या दोषांच्या अर्जावरही हरकत घेण्यात आली होती, परंतु त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, सत्तेचा गैरउपयोग करून हा निकाल दिला गेला आहे. मुख्यमंत्र्यांची भीती दाखवून आपले हित साध्य केले जात आहे. हे आपण दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आपण याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अपील करीत आहोत. सत्याला न्याय मिळेलच. मी नियमानुसारच माझी उमेदवारी दाखल केली होती, अशी प्रतिक्रिया डॉ. पाटील यांनी दिली आहे.