धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील वाळू घाट ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आजपासून बंद करण्यात आला आहे. आदेशीत केलेली प्रक्रीया पूर्ण करण्यास असमर्थतता दर्शविल्याने २७ मे पासून ठेकेदाराने नांदेड रेतीघाटाचा ताबा शासनाकडे घेण्यात यावा, अशी विनंती केली. त्यानंतर धरणगाव तहसीलदारांनी तात्काळ आजच आदेश काढत ठेका बंद करण्यात आल्याबाबत संबंधितांना एका पत्राद्वारे सूचित केले आहे. दरम्यान, उत्खननाच्या मोजणीनंतर ठेकेदाराकडून ठेका सरेंडर केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. तसेच अतिरिक्त उत्खनन आढळल्यास कारवाई होणार का?, असा प्रश्न सुज्ञ नागरिक आणि पर्यावरण प्रेमी विचारत आहेत.
गावकऱ्यांच्या मागणीमुळे शासनाकडून तापी घाटाची मोजणीची मागणी करण्यात आली होती. तसेच शासकीय घाटाची उत्खनन पूर्ण झालेले असून आता घाट पूर्णपणे बंद करण्यात यावा, अशी मागणी बरेच दिवस झाले जोर धरत होती. याबाबत विविध स्तरावर तक्रारी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पूर्ण काटेकोर पालन करण्यात वाहतुकदारांनी असमर्थता दर्शविल्याने वाळू वाहतूक घाट बंद करण्यात आला. नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते भरत सैंदाणे यांनी याबाबतत अतिशय ठोस पुरावे देत, तापी नदीचे पात्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून भविष्यातील धोके टाळण्यासाठी आताच शासनाने पुढे यावे, अशी विनंती केलेली होती. त्याची दखल घेत नांदेड येथील घाट बंद करण्यात आला. त्यानंतर धरणगाव तहसीलदारांनी आज रोजी सरपंच/ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत नांदेड, मंडळ अधिकारी साळवा भाग, नांदेड तलाठी आणि पोलीस पाटील यांना नांदेड येथील वाळू घाट बंद करण्यात अल्याबाबाबत एका पत्राद्वारे सूचित केले.
तीव्र उन्हाळ्यामुळे मोठ्या मोठ्या शहरांत देखील बोअरवेल इत्यादी पाण्याचे स्त्रोत बंद पडताना दिसून आलेले असून पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटत आहे. मोठ्या शहरांमध्ये महापालिका व इत्यादी मोठ्या यंत्रणा असल्याकारणाने पाण्याची गैरसोय होत नाही. मात्र ग्रामीण भागात एकदा पाण्याचा स्त्रोत आटले की, पिण्याचे आणि शेतीचे पाणी गंभीर चित्र निर्माण होईल, अशी कळकळीची विनंती गावकऱ्यांनी केलेली होती. भविष्यातील मोठे धोके टाळण्यासाठी वेळेवरच शासनाने पावले उचलणे महत्वाचे होते. त्यानुसार आमच्या तक्रारीनंतर उशिरा का असेना प्रशासनाने आमच्या तक्रारीनंतर मोजणीचे आदेश तहसीलदार यांनी १९ एप्रिल रोजी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग धरणगाव आणि उपअधिक्षक, भुमी अभिलेख धरणगाव यांना ठेक्याची दोन दिवसात मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ठेकेदाराने आज ठेका सरेंडर केला. परंतू अतिरिक्त उत्खननबाबत आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी आमची आम्ही लावून धरणार आहोत.
– भरत सैंदाणे (सामाजिक कार्यकर्ते, नांदेड)
सूचना : या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी धरणगाव महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. संपर्क झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया याच बातमीत अपडेट करण्यात येईल, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी !