मुंबई (वृत्तसंस्था) मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकलही पूर्णपणे कोलमडली आहे. मूसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी साचले आहे. मुंबईत आतापर्यंत १५०-२०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.