मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई सेंट्रल परिसरातील नायर हॉस्पिटलच्या ओपीडीत पाणी शिरल्याने रुग्णालय प्रशासनाची दाणादाण उडाली आहे.
मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी साचले आहे. तर नायर हॉस्पिटल परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाचे पाणी आत शिरल्यामुळे रुग्णालयातील साहित्य पाण्यावर तरंगतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. नायर रुग्णालय हे कोव्हिड रुग्णालय घोषित करण्यात आले आहे. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकलही पूर्णपणे कोलमडली आहे. हिंदमाता परिसरात नेहमीप्रमाणे पाणी साचून वाहतूक कोलमडली आहे. रस्त्यारस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत.
















