नाशिक (वृत्तसंस्था) अनैतिक संबधांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांवर गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकास दोघा भावांनी हेल्मेटचे वार करीत ठेचून ठार मारल्याची घटना रविशंकर मार्गावर घडली. या घटनेत एक भाऊ गंभीर जखमी झाला असून, माजी सैनिकाच्या हत्येप्रकरणी दुसऱ्या भावास अटक करण्यात आली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला आल्याने पतीने माजी सैनिकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत व सहायक आयुक्त सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
अमोल पोपट काटे-पाटील असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित चेतन घडे यास अटक करण्यात आली असून, अन्य संशयित जखमी कुंदन घडे याच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक-पुणे रस्त्यावरील विजय-ममता थिएटर परिसरातील रविशंकर मार्ग येथे रविवारी (दि. १०) रात्री उशिरा महादेव पार्क सोसायटीमध्ये ही घटना घडली. गोळीबार करीत एका इसमावर चाकूहल्ला करण्यात आल्याची माहिती ११२ या हेल्पलाइनवर पोलिसांना मिळाली. माहिती देणाऱ्याने मारेकऱ्यास पकडून ठेवले होते. माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी अमोल काटे हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत तर कुंदन घडे जखमी स्थितीत आढळला.
संशयित चेतन घडे याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार, माजी सैनिक अमोल काटे हा रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महादेव पार्क सोसायटीत आला. त्याने अनैतिक संबंधावरून कुंदन घडे यास जाब विचारला. यावेळी त्यांच्यात वाद सुरू असतानाच काटे याने आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. कुंदन घडे याने प्रसंगावधान राखत गोळी चुकवली. त्यानंतर काटे यांनी कुंदनवर चाकू हल्ला केला. त्यात कुंदन जखमी झाला. त्यानंतर कुंदनसह त्याचा भाऊ चेतन घडे या दोघांनी काटे यास बेदम मारहाण केली. हेल्मेटचे वार करीत अक्षरशः ठेचण्यात आल्यामुळे काटे जागीच गतप्राण झाला. पत्नीचे अनैतिक संबंध अमोल काटे यांच्याशी असल्याचे संशय चेतनलला आला. त्यानंतर चेतनने अमोलला ठार मारायचे ठरवले. अमोलमुळे चेतनचा संसार उध्वस्त झाल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे समोर आले.
पोलिसांनी चेतन घडे या संशयितास अटक केली असून, त्यास न्यायालयाने १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, दुसरा संशयित कुंदन घडे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक प्रवीण चौधरी व शिपाई मिलिंद बागूल तपास करीत आहेत. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक निरीक्षक सचिन बारी उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, सचिन चौधरी, उपनिरीक्षक मंगेश गोळे, आजिनाथ बटूळे, विशाल सपकाळे पोलीस नाईक गोविंद भामरे, हवालदार अंबादास बकाल, इम्रान शेख, विनोद लखन, शिपाई गौरव गवळी, सुरज गवळी, संदेश रघतवान, अनिल शिंदे, सतिश मढवई, सुनिल खरात, आनंद घुमरे आदींच्या पथकाने या घटनेचा २४ तासांच्या आत उलगडा केला.