भोपाळ (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. असे असतानाच मध्य प्रदेशात लसींच्या वाहतुकीत मोठा बेजबाबदारपणा झाल्याचं समोर आलं आहे. मध्य प्रदेशच्या नहसिंहपूरमधील करेली बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कोल्ड चेनचा कंटेनर बेवारस अवस्थेत सापडला. त्यात कोरोना लसींचे २ लाख ४० हजार डोस होते. या कंटेनरमध्ये चालक, वाहक उपस्थित नव्हते.
मध्य प्रदेशच्या नहसिंहपूरमधील करेली बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक कंटेनर चालू स्थितीत रस्त्याच्या कडेला बराच वेळ उभा असल्याची माहिती करेली पोलिसांना मिळाली. या कंटेनरमध्ये चालक, वाहक उपस्थित नव्हते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनरमध्ये असलेली कागदपत्रं तपासली. हा कंटेनर गुरुग्रामच्या टीसीआय कोल्ड चेन सोल्युशन कंपनीच्या मालकीचा असून तो भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसींचे २ लाख ४० हजार डोस हैदराबादहून पंजाबच्या कर्नालला घेऊन जात असल्याची माहिती कागदपत्रांतून पोलिसांना समजली. कंटेनरमध्ये पोलिसांना ३६४ मोठे खोके आढळले. त्यात कोवॅक्सिन लसींचा साठा होता. त्यांची एकूण किंमत ८ कोटी रुपये इतकी होती.