जळगाव (प्रतिनिधी) पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी ठाण्यातून गौरव पाटील (वय २३, रा. पाचोरा) या तरुणास अटक केली होती. गौरव नौदलाच्या गोदीत एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून काम करीत होता. या प्रकरणाचा ‘द क्लिअर न्यू’ने पाचोऱ्यातून ग्राउंड रिपोर्ट केला असता, एक वेगळीच बाजू समोर आली आहे. गौरवला अहमदाबादची राहणारी असल्याचे सांगणाऱ्या तरुणीने संपूर्ण प्रकरणात फसवल्याची धक्कादायक माहिती परिवारातील सदस्य आणि मित्रांसोबतच्या चर्चेतून समोर आली आहे.
साधारण परिवारातील गौरव साधारण मुलगा !
गौरवचे वडील साधारण वीस वर्षापूर्वी जळगाव तालुक्यातून पाचोरा शहरात वास्तव्यास आले. अर्जुन पाटील असे त्यांचे नाव. अवघी तिसरी शिकलेल्या वडिलांनी मिस्त्री काम करून दोघं मुलांना मोठं केलं. तर दुसऱ्याकडे धुनी भांडी करून आईने देखील संसारला हातभार लावला. गौरव लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. दहावी, बारावी नंतर त्याने सायन्समधून पदवी मिळवली. तर याच काळात त्याने डीझेल मॅकेनिक म्हणून आयटीआयचे शिक्षणही पूर्ण केले. यानंतर एकेदिवशी मुंबई नेव्हल डॉकची पेपरातील जाहिरात बघून त्याने फॉर्म भरला. त्यानंतर परीक्षा पास झाल्यावर तो एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून कामाला लागला. साधारण परिवारातील साधारण मुलगा उंच भरारी घेत असल्यामुळे अनेकांना त्याचे कौतुक वाटत होते.
फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याच्या काही दिवसानंतरच अनोळखी तरुणी आली संपर्कात !
एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ च्या काळात गौरव फेसबुकच्या माध्यमातून एका अहमदाबादची सांगणाऱ्या तरुणीच्या संपर्कात आला. परंतू तत्पूर्वी काही दिवस आधीच त्याचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. त्यावेळी लहान भाऊ विवेकने अकाऊंट कव्हर करून दिले होते. फेसबुकवरून सुरु झालेली चॅटिंग व्हॉट्सअपपर्यंत पोहोचली. त्यानंतर संबंधित तरुणी त्याच्यासोबत फेसबुक कॉलवरूनही बोलत होती. याच काळात तू खरचं नेव्हीमध्ये कामाला आहे का?, असे म्हणून त्याच्याकडून गोड बोलत कामाच्या ठिकाणावरील काही फोटो संबंधित तरुणीने मागवून घेतले. त्यानंतर एकेदिवशी संबंधित तरुणीने दोन हजार त्याला पाठवले. पैसे का पाठवले असावेत म्हणून भेदरलेल्या गौरवने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्या मुलीचे फेसबुक अकाऊंट डीअॅटीव्ह झालेले होते.
ऑक्टोबरपासून गौरव यंत्रणाच्या रडारवर !
यानंतर ऑक्टोबरपासून गौरव यंत्रणाच्या रडारवर आला. साधारण एक महिनाभर त्याला दररोज बोलावून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दिवाळीत गौरव घरी आला. त्यानंतर सोमवारी त्याला एटीएसमधून पुन्हा बोलावणे झाले. कदाचित जप्त केलेला मोबाईल परत देण्यासाठी बोलवले असावे म्हणून यावेळी गौरवसोबत त्याचे वडीलही गेलेत. परंतू ठाण्याला एटीएस ऑफिसला पोहचल्यावर अधिकाऱ्यांनी गौरवला अटक केल्याची माहिती वडिलांना दिली. यानंतर त्यांनी रडत रडतच पाचोरा गाठले. या काळात एका मित्राने त्यांना वकील मिळवून दिला. गौरव पाटीलला अटक केल्यानंतर न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने त्याला एक आठवड्याची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, लोकसत्ताने आज दिलेल्या बातमीत एटीएस अधिकाऱ्यांनी गौरव पाटीलला पाकिस्तानकडून खूप पैसे मिळालेले नाहीत. पण निश्चित रक्कम किती होती, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.
माझा मुलगा असं करूच शकत नाही !
नेव्हल डॉकमध्ये काम करत असतांना एका स्पर्धेत त्याला गोल्ड मेडल मिळाले असल्याचेही त्याच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, गौरवच्या घरची परिस्थिती जेमतेमच आहे. आमचा मुलगा पोलीस किंवा देशसेवेत जाण्यासाठी मोठी मेहनत घेत होता. कधी माझ्यासोबत तर कधी पेट्रोल पंपवर काम करून त्याने शिक्षण पूर्ण केले. तो असं करूच शकत नाही. माझा पोरगा देशभक्त आहे, तो देशासोबत गद्दारी करेल, या गोष्टीवर माझाच काय कुणाचाही विश्वास बसणार नाही, असे सांगत असतांना गौरवच्या वडिलांचे डोळे पाणावले होते. तर आई आणि आजी तर धायमोकलून रडत गौरव किती साधा भोळा असल्याचे किस्से सांगत होते.
आमच्या मित्रावर आमचा पूर्ण विश्वास, त्याला ‘त्या’ मुलीनेच फसवले !
दुसरीकडे गौरवचे अनेक बालपणीचे मित्र देखील त्याची बाजू घेत तो असे करूच शकत नसल्याचे सांगत होते. जीवाभावाचा मित्र असलेल्या कुणाल नामक तरुणाने तर गौरव माझा बालपणीचा मित्र आहे. तो घरात सांगणार नाही, अशाही गोष्टी तो मला सांगत होता. अहमदाबादच्या एका मुलीसोबत त्याची सोशल मीडियातून चॅटिंग सुरु असल्याचे त्याने मला सांगितले होते. त्याने जर काही केले असते तर तो एक महिना दररोज एटीएसच्या ऑफीसला स्वतःहून जात-येत राहिला असता का?, आताही त्याला बोलवल्याबरोबर तो मुंबईला एटीएसच्या ऑफिसला हजर झाला. त्याने काहीही केलेले नाही. काही केले असते तर तो बोलावले तेव्हा पोलिसांकडे गेला असता का?, त्याला फेसबुकवरून चॅटिंग करणाऱ्या मुलीनेच या सर्व प्रकरणात गोवले असणार, अशी आमची खात्री आहे. एवढेच नव्हे तर गौरव एवढा साधा होता की, तो आपल्यापेक्षा लहान मुलांसोबत विट्टीदांडू, क्रिकेट खेळायचा, असेही गौरवचे मित्र सांगत होते.
संवेदनशील विभागात काम करणाऱ्या तरुणांनी सावध राहणे गरजेचे !
गौरव अवघ्या विशीतील तरुण आहे. मोठी मेहनत करून शिक्षण पूर्ण करून तो देशसेवेच्या नौकरीचे स्वप्न बघत होता. एका वर्षासाठी का असेना तो नेव्हल डॉकमध्ये कामालाही लागला. परंतू सोशल मिडियामुळे तो नको त्या प्रकरणात अडकला. त्यामुळे संवेदनशील विभागात काम करणाऱ्या तरुणांनी ‘हनी ट्रॅप’ सारख्या प्रकरणांपासून सावध राहिले पाहिजे. मुलींच्या नावाने असणारे फेक अकाऊंट ओळखता आली पाहिजेत. अगदी कोणत्याही परिस्थितीत आपण काम करत असलेल्या विभागाची माहिती, फोटो कधीही अनोळखी व्यक्तीला देता कामा नये. अगदी पालकांनी देखील याबाबत वेळोवेळी मुलांना याबाबत सावध केले पाहिजे. गौरव पाटील प्रकरणातून धडा घेत संवेदनशील विभागात काम करणाऱ्या तरुणांनी सावध राहणे आता गरजेचे झाले आहे.