जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात नायट्रोझेपाम टॅबलेट आयपी व नायट्रोसम नामक अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत, असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे नशेच्या गोळ्या घेऊन हत्येसारखे गंभीर गुन्हे केल्याचे प्रकार नागपुरात पोलीस तपासाअंती उघड झाले होते. दरम्यान, पिडीत पालकांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत संवाद साधून याबाबतची व्यथा मांडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहे. नशेसाठी अशा औषधीही वापरल्या जाताय, अशी माहिती समोर येत आहे. गोळ्यांची किंमत कमी असल्यामुळे रुग्णांऐवजी नशा करणाऱ्यांकडूनच त्याची मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी या नशेच्या गोळ्या विकल्या जात आहेत.
गोळ्या घेतल्या की कुणाच्या सांगण्यावरून केले, ते दोन-चार दिवस लक्षातच राहत नाही
नायट्रो-१० (गुन्हेगारांच्या भाषेत डी, दो-टेन) आणि अशाच दुसऱ्या दोन गोळ्या घेतल्या की दोन बंपर दारू प्यावी, अशा मोडमध्ये (नशेत) संबंधित व्यक्ती जातो. त्यामुळे त्याने काय केले, कसे केले, कुणाच्या सांगण्यावरून केले, ते दोन-चार दिवस त्याच्या लक्षातच राहत नाही. त्यामुळे पोलिसांकडून त्याला थर्ड डिग्रीच काय कोणतीही डिग्री दिली तरी त्याचा थंड प्रतिसाद असतो. नागपुरातील काही गुन्ह्यांच्या तपासातूनही ही धक्कादायक माहिती समोर आली होती.
काय होतात परिणाम?
अल्प किमतीत मिळणाऱ्या या गोळ्या औषध म्हणून दिल्या जातात. वैद्यकीय सूत्रांनुसार, वेदनेची तीव्रता कमी व्हावी. कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करता यावा, यासाठी या गोळ्यांचा रुग्णांसाठी थोडक्यात प्रमाणात वापर केला जायचा. विशेष म्हणजे, या गोळ्यांचा डोस निद्रा (झोप) दूर ठेवतो. अफू (काला माल) पेक्षा खूप कमी किमतीत त्या मिळत असल्याने त्यामुळे लांब पल्ल्याची वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर या गोळ्यांचा वापर करू लागल्याचे राज्यात काही ठिकाणी समोर आले आहे. नागपूरमध्ये तर गुन्हेगारांनी आपल्या पाठीराख्यांना, सुपारी देणाऱ्यांना, भाईंना पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी या गोळ्यांचा वापर सुरू केला होता.
माझा लहान भाऊ आपल्या मित्रांसोबत मागील काही दिवसापासून नशेच्या गोळ्यांच्या आहारी गेला होता. त्यांना नशेत त्यांनी काय केले याचे कुठलेही भान राहत नव्हते. त्यांना कुणी मारलं किंवा त्यांनी कुणाला मारलं हे देखील त्यांच्या लक्षात राहत नव्हते. मला याबाबत वेळीच माहिती मिळाली, मी आता माझ्या भावाला यातून बाहेर काढण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे. परंतू नशेचे हे रॅकेट जिल्ह्यातून लवकरच हद्दपार झाले पाहिजे. अन्यथा तरुणाई या व्यसनांच्या विळख्यात पूर्णतः बरबाद होऊन जाईल.
– पिडीत रुग्णाचा मोठा बंधू
माझ्याकडे एका तरुणाचा वडीलबंधू त्याच्या भावाला घेऊन आला होता. तो तरुण मागील काही महिन्यांपासून आपल्या मित्रांसमवेत नशेच्या गोळ्यांचे सेवन करत होता. या या नशेच्या आहारी गेला होता. परंतू मागील काही दिवसांपासून आम्ही त्याला त्यातून बाहेर काढण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. माझ्याकडे काही रुग्ण असे आले की, त्यांना नेमकं काय होतंय हे देखील सांगता येत नव्हतं. गांजा किंवा अशा गोळ्या सतत घेतल्यानंतर जर त्यांना अचानक काही दिवस नशा केला नाही तर, रुग्णामध्ये विड्रावल सिमटन्स आढळून येतात. त्यातीलच हा प्रकार होता. पालकांनी आता अधिक सावध होण्याची गरज आहे.
– डॉ. पुष्कर महाजन
कफ, कॅन्सर किंवा जुने गंभीर आजार असलेले वयोवृद्ध रुग्णांच्या वेदना कमी व्हाव्यात अगदी त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करता यावा, यासाठी या गोळ्यांचा रुग्णांसाठी अल्प प्रमाणात वापर केला जातो. परंतू याचा वापर जर नशेसाठी केला तर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो. नशेच्या गोळ्यांच्या आहारी गेलेला तरुण मनोरुग्ण होण्याचा धोका असतो. सतत अशा गोळ्या घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
– डॉ. स्नेहल पाटील
विजय वाघमारे (9284058683)