जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते अॅड. विजय भास्कर पाटील हे नवनवीन घोटाळे उघडकीस आणताय. अॅड. पाटील यांच्या तक्रारीनंतर जामनेर आणि जळगाव कृउबाच्या बीओटीतत्वावरील शॉपिंग कॉप्लेक्समधील घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने दोन वेगवेगळ्या समित्या नेमल्या आहेत. तर आता जामनेर एमआयडीसी भूसंपादन घोटाळा रडारवर असल्याची चर्चा आहे. कारण शेतकऱ्यांकडून किरकोळ भावाने जमिनी खरेदी करत त्या जमिनींवर बोगस वृक्षलागवड व इतर कृषी उद्योग दाखविण्यात आले आहेत. तसेच हा घोटाळा हजारो कोटींच्यावर असून त्यामुळे भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात येवू नये, अशी तक्रार अॅड. पाटील यांनी डिसेंबर २०२० मध्येच राज्याचे कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) यांच्याकडे केली आहे. दरम्यान, मागील दोन घोटाळ्यांप्रमाणे आता जामनेर एमआयडीसी भूसंपादन घोटाळ्याचीही लवकरच चौकशी लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अॅड. विजय भास्कर पाटील यांनी मागील काही दिवसात दोन मोठे घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर बीओटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्यासह जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या १९२ शॉपिंग गाळ्यांच्या बांधकामात कोट्यावधींच्या घोटाळ्याचा समावेश आहे. या दोन्ही घोटाळ्यांच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमल्याची माहिती वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत अॅड. विजय पाटील यांनी स्वत: दिली आहे.
दोन्ही घोटाळ्यात गिरीश महाजनांवर आरोप
जामनेर शॉपिंग कॉम्प्लेक्स घोटाळ्या प्रकरणी चौकशी समितीचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त सतिश सांगळे, तसेच राजन पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रकांत वानखेडे या तीन अधिकाऱ्यांची समिती चौकशी करत आहे. तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांप्रकरणी झालेल्या घोटाळ्याची चौकशी कृषि पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक सी. एम. बारी तर कृषि पणन मंडळाचे कनिष्ठ अभियंता हेमंत पी. अत्तरदे. आणि व्ही. एम. गवळी हे सदस्य करीत आहेत. जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात साधारण २०० कोटींचा अपहार झाला आहे. एवढेच नव्हे तर त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील लाभार्थी असल्याचा खळबळजनक आरोप अॅड.विजय भास्करराव पाटील यांनी केला होता. त्याचपद्धतीने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या १९२ शॉपिंग गाळ्यांच्या बांधकामात साधारण १०० कोटींच्या घोटाळ्यातही माजी मंत्री गिरीश महाजन हे सहभागी असल्याचा आरोप अॅड.विजय पाटील यांनी केलेला आहे. दरम्यान, जामनेर एमआयडीसीत भूसंपादनात घोटाळा करणारेच बीएचआर घोटाळ्यात आरोपी असल्याचे अॅड. पाटील यांनी तक्रारी म्हटले आहे.
जामनेर एमआयडीसी भूसंपादनाबाबत कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार
जामनेर येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी काही व्यापाऱ्यांनी राजकीय सत्तेचा वापर करून शेतकऱ्यांकडून किरकोळ भावाने जमिनी खरेदी केल्या असून त्या जमिनीवर बोगस वृक्षलागवड व इतर कृषी उद्योग दाखवून शासनाकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे. तसेच यामध्ये शासनाची स्टॅम्प ड्युटी देखील बुडवली आहे.सदर घोळ हजारो कोटीच्यावर असल्याचे समजते. त्यामुळे भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात येवू नये, अशी तक्रार अॅड.विजय पाटील यांनी २ डिसेंबर २०२० रोजी एमआयडीसीच्या कार्यकारी अधिकाऱ्याकडे इमेल द्वारे केली होती.
या तक्रारीत अॅड.विजय पाटील यांनी म्हटले होते की, नुकतेच जळगाव येथे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी संस्थेवर पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या असून त्यातून सुमारे हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे समजते. या प्रकरणातील आरोपींचे प्रस्तावित जामनेर एमआयडीसीच्या जागेशी संबंधित असल्याचे समजते. तसेच शासनाने या अधिग्रहित केलेल्या जमिनी ज्या व्यक्तींनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या आहेत त्या व्यक्तींची नावे भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेली आहेत. व सदर गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये देखील त्या आरोपींचे नावे आलेली आहेत.
या अधिग्रहित केलेल्या जमिनी पोटी एममायडिसी लवकरच मोठी रक्कम अदा करणार असल्याचे देखील समजते. तरी आम्ही आपल्याला या मेलद्वारे सूचित करू इच्छितो की, सदर जमिनीचा मोबदला आपण सद्य परिस्थितीत देऊ नये. कारण या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे करीत आहे. सदरची रक्कम कोणत्याही परिस्थितीत वितरीत करण्यात येऊ नये अन्यथा होणाऱ्या परिणामास एमआयडीसी व त्याचे अधिकारी जबाबदार राहतील. दरम्यान, जामनेर एमआयडीसी भूसंपादन प्रक्रियेत मोबदला म्हणून मागील पाच वर्षापासून एकाही शेतकऱ्याला एक रुपया मिळालेला नाहीय. फक्त गिरीशभाऊंची बदनामीसाठी भूसंपादनात कोरोडाचा भ्रष्टाचार झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित केल्याचा आरोप काही जणांनी केला होता.