
जळगाव (प्रतिनिधी) – स्पिरीटपासून देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्याच्या भरारी पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला. या ठिकाणाहून स्पिरीटपासून तयार केलेला देशी दारुचा साठा, रिकाम्या बाटल्या, बूच, मशनरी व इतर साहित्य असा एकूण १८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील वैजापूरनजीक असलेल्या मुळ्यावतार येथे करण्यात आली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
चोपडा तालुक्यातील मुळ्यावतार येथे गाळ्यांमध्ये स्पिरीटपासून देशी तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, नवनाथ घोडके, जवान राहुल भगत, दिलीप नागरे, राजाराम सोनवणे, विजय ढवळे, आरती घोंगडे, चोपडा विभागाचे निरीक्षक कय्यूम मोमीन, जवान भूषण परदेशी हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्पिरीटपासून मद्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या प्रकरणी जवान विकास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण करत आहेत.
१८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
पथकाने छापा टाकून तेथून स्पिरीटपासून तयार केलेला देशी दारुचा साठा, सीलबंद बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट पत्र्याची बूचं, लेबल, पुठ्याचे बॉक्स, इलेक्ट्रीक मोटर, पाण्याच्या टाक्या, सिलिंग मशीन व इतर बॉटलिंगचे साहित्य असा एकूण १८ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्यात केली जात होती विक्री
पथकाने कारखान्यामधून जप्त केलेल्या लेबलवर सदरचे मद्य हे महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असे छापलेले आढळून आले. त्यामुळे या कारखान्यात बनावट देशी मद्य तयार करून ते राज्यात विक्रीच्या उद्देशाने त्यावर असे लेबल लावले असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.
















