पंढरपूर (वृत्तसंस्था) पंढरपूरमध्ये होणाऱ्या वादग्रस्त कॉरिडॉरच्या मुद्द्यावर आव्हान देऊ नये. अन्यथा देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, असा घरचा आहेर भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. सुब्रमण्यम स्वामी आज पंढरपूरमध्ये (pandharpur)आले होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती टीका केली आहे.
पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी (subramanian swamy)आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. आज पंढरपुरात सुब्रमण्यम स्वामी यांनी नागरिकांची भेट घेत पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांचा नेमका विरोध का आहे? हे समजून घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंढरपुरात सर्व देशवासियांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल मंदिर आहे. कॉरिडॉरऐवजी येथील पायाभूत सुविधांचा आधी सरकराने विकास करायला हवा, असे म्हटले.
पंढरपूरमधील विकास आराखड्याला स्थानिकांनी विरोध केलाय. यासंबधी स्थानिक नागरिकांनी मुंबईत माझी भेट घेऊन या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे. भाजपाचे नेते असतानाही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बेधडक बोलणाऱ्या स्वामी यांनी पंढरपुरात येऊन फडणवीस यांना इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पंढरपूर कॉरिडॉर होणार, असे वक्तव्य केले आहे. याचा समाचार घेताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, प्रकल्पाबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तरीही स्थानिकांवर हा प्रकल्प लादल्यास देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. या सरकारने अहंकारात काहीही करू नये. त्याऐवजी पंढरपूर सुंदर करण्यावर त्यांनी भर द्यावा, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
















