सातारा (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्रीपदी असताना मला भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार राज्यात असताना अनेक नेत्यांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. यात मलाही ऑफर देण्यात आली होती, असा दावा करत शिंदे यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
ते शनिवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या ऑफरसंदर्भात धक्कादायक खुलासा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असेही मला सांगण्यात आले होते, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. मात्र, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन, असेही शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी शशिकांत शिंदे हे एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत पाठवलं होतं. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.