मुंबई (वृत्तसंस्था) जर नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन अटक होऊ शकते तर ईडीने हेच तर्क भाजपासाठीही लावलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीने अटक केली पाहिजे. मी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय.
माजी आमदार अनिल गोटे यांनी सक्तवसुली संचलनालयाला म्हणजेच ईडीला पत्र लिहून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय. गोटे यांनी २०१४ पर्यंत या बिल्डरने भाजपाला कधी निधी दिला नव्हता असंही म्हटलंय. मात्र राज्यामधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर भाजपाने एरकेडब्यू डेव्लपर्सकडून २० कोटींचा निधी घेतला. ही कंपनी राजेश वाधवान यांच्या मालकीची असून सध्या ते पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगामध्ये आहेत. गोगटे यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेपर्यंत आपल्याला भाजपाला मिळालेल्या या निधीसंदर्भात कल्पना नव्हती असा दावाही गोटे यांनी केलाय.
तसेच फडणवीस यांनी एका ड्रग्ज माफिया असणाऱ्या इक्बाल मिर्चीशीसंबंधित असणाऱ्या एका बड्या बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप गोटे यांनी केलाय. इक्बाल मिर्ची हा १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आहे. फडणवीस यांनी गोटे यांचे हे सर्व आरोप फेटाळलेत.