मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारकडून मराठा आंदोलकांची होणारी गळचेपी म्हणजे आणीबाणीच आहे, असे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. भाजपलाच हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटते. तशी परिस्थिती निर्माण करून फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. ‘महाराष्ट्रात आणीबाणी लागू करुन देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचे आहे’,अशी टीका राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केली. यावेळी त्यांनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार हे ‘झिरो स्टँडर्ड’ आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल, असे संजय राऊत यांनी म्हटले. ‘मराठा आंदोलकांची सरकारकडून होणारी गळचेपी म्हणजे दुसरी, आणीबाणीच होय’,या फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपला हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असे वाटते. आणीबाणी निर्माण करुन फडणवीसांना परत सत्तेत यायचे आहे,’ असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, ‘इंदिरा गांधीच्या काळातील आणीबाणीचा शिवसेनेला विसर पडलेला नाही. मोदी सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल.