नागपूर (वृत्तसंस्था) काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, ‘काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत, त्या गादीचा एक मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी त्यासंदर्भात मी बोलणार नाही. मला एवढंच वाटतं की त्या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात संभाजीराजे म्हणाले आहेत की “मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो की मी जे बोललो ते सत्य बोललो” मला असं वाटते की त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे.
मला एकाच गोष्टीच दुःख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना हे समजत नाही की त्यांच्या अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना खोटे ठरवत आहेत. तर दुसरीकडे ते शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काही अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे असं करत आहे त्यांच्या अशा वागण्याबद्दल मला प्रचंड दुःख आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
युवराज संभाजीराजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते. आणि सध्याही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्यांचे कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.