मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रूईखेडाजवळ बनावट देशी दारू बनवणार्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर मूख्य सूत्रधारासह दोघे पसार झाले आहेत. मंगळवारी मध्यरात्री रेकी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटकेतील संशयीतांना भुसावळ न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
17 लाख 43 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून रेकी सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्यांच्या पथकाने अचानक जाऊन छापा टाकत दिडशे बॉक्समधील तयार दारू, रीकाम्या बाटल्या, बूच आदी मिळून 17 लाख 43 हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली तर मुख्य सुत्रधारासह दोघे पसार झाले आहेत.
यांच्या पथकाने केली कारवाई
विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजीत कपाटे, निरीक्षक सी.एच.पाटील, राजेश सोनार, सतीश पाटील, शिवनाथ भगत, सोमनाथ शेलार, भरारी पथकाचे आनंदा पाटील, अमोद भडांगे (पूरनाड), विपूल राजपूत, सागर देशमुख, विजय परदेशी, मुकेश पाटील, नरेद्र पाटील, नंदू नन्नवरे, धनसिंग पावरा, दिनेश पाटील, रघुनाथ सोनवणे, विठ्ठल हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
धरणगावातही आंतरराज्यीय टोळीचा सहभाग झाला होता उघड !
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे होते. एवढेच नव्हे तर, गुन्हयाची व्याप्ती मोठी होती. अगदी यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पोलीस तपासात , बनावट मद्याच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असून आंतरराज्यीय टोळीचा यात समावेश असल्याचे तपास समोर आहे. दरम्यान, यानिमित्ताने जिल्ह्यातील बनावट दारू प्रकरण धरणगावपासून सुरु झाल्यानंतर थेट गुजरातसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पोहचल्याचे दिसून येत होते. परंतू आता धरणगावनंतर जळगाव जिल्ह्यातीलच मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एकदा देशी दारूचा बनावट कारखाना सुरु असल्याचे समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यात बनावट देशी दारू कारखान्याची सेम मोडस ऑपरेंडी !
धरणगावात दोन वर्षापासून बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरु होता. परंतू स्थानिक पातळीवर हे बनावट मद्य विकले जात नव्हते. त्यामुळे गावात पाहिजे तशी चर्चा होत नव्हती. परंतू अनेक महिन्यांपासून बनावट मद्य कारखान्याबाबत उत्पादन शुल्क विभागाला टीप दिली जात होती. यामुळे धंदा करणे कठीण झाले होते. यानंतर पाण्याच्या जारच्या नावाखाली बनावट दारूचा उद्योग सुरु ठेवण्याची शक्कल लढवण्यात आली. शेवटी एकेदिवशी हा धंदा उघड झालाच. आता मुक्ताईनगरमध्येही बनावट देशी दारू कारखान्याची सेम मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. कारण याठिकाणी पोल्ट्री फार्मच्या मागे हा गोरख धंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे. थोडक्यात धरणगावात पाण्याच्या जारच्या नावाखाली तर मुक्ताईनगरमध्ये ‘पोल्ट्री फार्म’च्या मागे बनावट देशी दारूचा कारखाना उघड झाल्यामुळे दोघं ठिकाणी गुन्ह्याची सेम मोडस ऑपरेंडी दिसून येत आहे. आता फक्त यात ‘धरणगाव कनेक्शन’ उघड झाले नाही म्तहणजे मिळवले. कनेक्शन उघड झाले तर मात्र, पुन्हा एकदा साखळी उघड झाल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जात आहे.
















