नंदुरबार (प्रतिनिधी) येथील धुळे चौफुलीजवळ एका इसमास ६ लाखांच्या बनावट नोटा देवून एक लाखांची रोकड हिसकावून नेणार होते. मात्र, पोलिसांना याचा सुगावा लागल्याने भामट्यांचा हा प्रयत्न फसला. एलसीबीच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून बनावट नोटांच्या बंडलसह सुमारे एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथील दर्गाहसमोर तीन इसम बनावट नोटा बाळगून एका व्यक्तीला १ लाख रुपयांचे ६ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडील रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने धुळे चौफुली येथील दर्गाहजवळ जाऊन खात्री करता तीन इसम हे संशयितरित्या एका कॉम्प्लेक्सजवळ उभे असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक जण फोनवर संशयितरित्या बोलत असल्याचे आढळून आले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्याने पळ काढला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ईनेश दिपू भोसले (वय २४), बाळूशेठ सजनसिंग भोसले (वय ३२, दोघे रा. जामदा, ता. साक्री) असे सांगितले. तर पळून गेलेल्या इसमाचे नाव बिनोर महारू पवार (रा. जामदा ता. साक्री, जि. धुळे) असे सांगितले. दोघा संशयितांकडून एकुण १ लाख ८० हजार रुपये किंमतीचा हस्तगत करण्यात आला. यामध्ये बनावट नोटांचे तीन बंडल, ३ मोबाईल, १५ हजार रुपये रोख रक्कम, एक चेन, २ वाहनांचा समावेश आहे. सदरचा मुद्देमाल त्यांनी काही दिवसांपूर्वी दोंडाईचा शहरात एका व्यक्तीस अडवून त्याच्याकडून जबरीने चोरी केल्याची कबुली दिली तर आता एका व्यक्तीकडून १ लाख रुपये घेऊन त्याला ६ लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे खोटे आमिष दाखवून त्याच्याकडून जबरीने रक्कम हिसकावून घेणार असल्याची कबुली संशयितांनी दिली. सदरचा कट त्यांचा साथीदार विक्की आचार चव्हाण (रा. जामदा ता. साक्री जि. धुळे) याने रचल्याचे सांगितले.
संशयितांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोहेकॉ. राकेश मोरे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, पोना, अविनाश चव्हाण, पोशि. राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.