पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुमित्रा भावे यांनी १९८० च्या दशकापासून चित्रपट या माध्यमाला आपलंस करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी काही लघुपट बनवले. त्यांनतर त्यांनी चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुनील सुकथनकर यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दोघांनी मिळून जवळपास १७ अत्यंत महत्वाचे चित्रपट दिले. त्यापैकी दहावी फ, दोघी, अस्तु, नितळ, कासव आदी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या ‘कासव’ या चित्रपटाने २०१७ मध्ये सुवर्ण कमळही मिळवलं.
सुमित्रा भावे या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या. तर त्यांचं लेखनही तितकंच महत्वाचं होतं. कथा, पटकथा, गीतलेखन आदी विभागात त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. जगण्याजवळ जाणारे विषय अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मांडताना त्याची मांडणी त्यांनी कधीच बोजड वा अवघड होऊ दिली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी महत्त्वाचे विषय तितक्याच हळूवारपणे मांडले. ‘अस्तु’ या चित्रपटात त्यांनी अल्झायमर झालेल्या व्यक्तीची मानसिकता मांडली. तर ‘दहावी फ’सारख्या चित्रपटातून त्यांनी मुलं आणि शिक्षक यांच्या नातेसंबंधाना अधोरेखित केलं होतं. ते करताना मुलांच्या मानसिकतेचा उभा छेद त्यांनी आपल्या चित्रपटातून मांडला होता. चित्रपट हे माध्यम सर्जनशील आहेच. कलात्मक आहे. पण त्यासाठी प्रचंड शारीरिक, मानसिक कष्ट लागतात. मोठी आर्थिक उलाढाल असते. तरीही चित्रपट हे शिक्षणाचं, परिवर्तनाचं महत्त्वाचं माध्यम आहे असं त्या आवर्जून नमूद करत.
सुमित्रा या दीर्घकाळापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होत्या. आज सकाळी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.