कोलकाता (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के चं निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता.
प्राथमिक माहितीनुसार, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, डॉक्टरांकडून अद्याप याबाबत काही स्पष्ट सांगण्यात येत नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण समजू शकेल. केके हे दोन दिवसांच्या कॉन्सर्टसाठी कोलकातामध्ये आले होते. सोमवारीही त्यांनी एका कॉन्सर्टमध्ये भाग घेतला होता. विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता. दुसऱ्या दिवशी कॉन्सर्टनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं
केके यांच्या निधनानं बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी ट्विट केले आहे. केके यांच्या निधनानं मी दुःखी झालो आहे. त्यांच्या गाण्यांतून मनातल्या प्रत्येक भावना व्यक्त व्हायच्या. त्यांच्या गाण्यांमधून ते नेहमी आठवणीत राहतील, अशा शब्दांत केके यांना मोदींनी श्रद्धांजली वाहिली. गायक जावेद अली यानंही शोक व्यक्त केला आहे. मला धक्काच बसला आहे. केके यांचे निधन झाल्याची माहिती मला मॅनेजरकडून मिळाली, असे जावेद अली म्हणाला. गायक उदित नारायण यांनीही दुःख व्यक्त केलं. लतादीदींनंतर बप्पीदा यांचे निधन झाले आणि आता केके यांनी जगाचा निरोप घेतला. हे जग सोडून जाण्याचे त्यांचे हे वय नक्कीच नव्हते, असे ते म्हणाले.
आपल्या जादुई आवाजानं तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या केके यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. नव्वदच्या दशकात ‘यारो’ या गाण्यातून ते यशोशिखरावर पोहोचले होते. केके यांची गाणी नेहमीच नवी भासत असत. ‘खुदा जाने’ सारखी रोमँटिक गाणी, ‘इट्स द टाइम टू डिस्को’ किंवा ‘कोई कहे कहता रहें…’ यांसारखी डान्स नंबर्स, तसेच ‘तडप तडप के इस दिल से…’ यांसारखी त्यांनी गायलेली सॅड सॉंग्ज हृदयाचा ठाव घ्यायची.