नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. नामदेव भगवान सैंदाणे (वय ५६) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव भगवान सैंदाणे यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे शेतातील उत्पादन घटल्याने ते कर्जबाजारी झाले होते. याच नैराशातून त्यांनी आज पहाटे ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील सर्व सदस्य शेतात गेलेले असतांना नामदेव सैंदाणे यांनी आज टोकाचे पाऊल उचलले. नामदेव सैंदाणे यांचा मृतदेह धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईक पुन्हा नांदेड येथे घेऊन गेले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार करीम सैय्यद हे करीत आहेत.