जळगाव (प्रतिनिधी) केवायसी अपडेट करुन देण्याच्या नावाखाली चोपडा तालुक्यातील आडगाव येथील एका शेतकऱ्याची तब्बल ६ लाख १७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून या प्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरुन ऑनलाईन ठगाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील आडगाव येथे महेंद्र धोंडू जाधव (वय ४२) हे शेतकरी वास्तव्यास आहे. त्यांना दि. ८ मार्च रोजी एका राष्ट्रीयकृत बँकेमधून बोलत असल्याचे सांगत शर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. तसेच महेंद्र जाधव यांचे बँक खाते आधार व पॅनसोबत लिंक नसल्याने केवायसी पूर्ण करण्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन महेंद्र जाधव यांना लिंक प्राप्त झाली. त्या लिंकमुळे जाधव यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन, संबधिताच्या बँक खात्यातून ६ लाख १७ हजार रुपये घेऊन, जाधव यांची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी महेंद्र जाधव यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करुन शर्मा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतिष गोराडे हे करत आहेत.