नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
केंद्र सरकार तिन्ही कायदे मागे घेत नसल्याने आता शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंधू बोर्डर येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संघटनांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सर्व संघटनांना केलं आहे. दिल्ली – गाझीपूर बोर्डर बंद करण्यात आली आहे. उद्या सरकार सोबतच्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर दिल्लीतील भाजीपाला तसेच इतर सामग्री बंद करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे. भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-लाखोवाल) सरचिटणीस एचएस लखोवाल यांनी सिंधू सीमेवरील (दिल्ली-हरियाणा सीमा) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गुरुवारी आम्ही सरकारला सांगितले की, ‘नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास ८ डिसेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल.’ अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला म्हणाले की, ‘याला फक्त पंजाब चळवळ म्हणणे सरकारचे षडयंत्र आहे, पण आज हे आंदोलन संपूर्ण भारतभर सुरू आहे आणि पुढेही होईल. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले. सरकारने उद्या कायद्यात दुरुस्तीबाबत चर्चा केल्यास ती स्वीकारणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे.’
कालच्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं जेवणही नाकारलं. त्यांनी लंगरमधलं जेवणच खाणं पसंत केलं होतं. यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधली विश्वासाची दरी किती लांब आहे दिसतं. दुसरीकडे प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला. इतरही अनेक खेळाडू उद्या अवॉर्ड वापसी करणार आहेत. वाहतूकदार, वकिलांच्या संघटनाही शेतकऱ्यांसाठी पुढे येतायत. त्यामुळेच हा वाढता दबाव सरकार कसा हाताळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.