मुंबई (वृत्तसंस्था) कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकर्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येत्या ९ डिसेंबरला राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे.
शरद पवारही या शिष्टमंडळात सहभागी असणार आहे. शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी नवे कृषी कायदे मागे घ्यावे या आपल्या भूमिकेचं समर्थन करत जवळपास ‘मौन व्रत’ धारण केलं. सरकारनं हे कायदे मागे घेणार की नाही याचं उत्तर केवळ ‘होय’ की ‘नाही’ या शब्दांत द्यावं अशीही भूमिका शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. बैठकीत दोन वेळा अशी स्थिती आली की शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी बहिष्कार टाकायच्या स्थितीत होते. सरकारकडून त्याच त्याच मुद्द्यांवर चर्चा होत असल्यानं आता आम्हाला अधिक रस नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. सरकारनं ९ पॉईंटसवर प्रश्नोत्तर स्वरुपात समाधान करण्याचा प्रयत्न केला. मागच्या दोन बैठकांमधले कामकाजाचे तपशील लिखित स्वरुपात घेतले. काही मुद्द्यांवर लवचिकता दाखवायचाही प्रयत्न केला. पण शेतकरी संघटनाचे नेते कायदा मागे घेण्यावर ठाम होते.