टोकियो वृत्तसंस्था । प्रकृतीच्या कारणास्तव जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलीय. यामुळे त्यांच्या जागी योशिहिदे सुगा हे जपानचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पक्षाने योशिहिदे यांना आपले नेता म्हणून निवडले आहे.
ऑगस्टच्या उत्तरार्धात आरोग्याच्या कारणास्तव शिंझो आबे यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची सोडण्याची घोषणा केली होती. सध्या जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) सत्तेत आहे. शिंझो आबे यांनी पद सोडत असल्याची अचानक घोषणा केल्यानंतर आशियातील बलाढ्य देशांत खळबळ उडाली होती. या घोषणेचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिंजो आबे यांना खासगीत बोलावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, योशिहिदे सुगा जपानमधील नवे पंतप्रधान असतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी जपानच्या सत्ताधारी पक्षामध्ये नवीन नेत्याच्या निवडणुकीवर मतदान झाले. सुगा यांनी ही निवडणूक जिंकली आहे. एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. यानंतर विजेत्या व्यक्तीचा पंतप्रधानपदी राज्याभिषेक केला जाईल. सध्याच्या जपानच्या संसदेची मुदत सप्टेंबर 2021पर्यंत आहे.