नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार हा बंद सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत असणार आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला आज चार महिने पूर्ण होणार असल्याने संयुक्त किसान मोर्चाने १२ तासांचा भारत बंद पुकारला आहे. याचे पडसाद उत्तर भारतात दिसू लागले आहेत. दिल्ली-गाझीपूर सीमेवर आंदोलकांनी पुन्हा एकदा हायवे बंद केला आहे. गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवर आंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, एमएसपी व खरेदीवर कायदा बनवावा, शेतकऱ्यांवर दाखल केलेले सर्वप्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत, वीज विधेयक, प्रदूषण विधेयक मागे घ्यावे, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी कराव्यात अशा आजच्या भारत बंदच्या मागण्या आहेत.
शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, सीपीआयएमसह अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, बहिऱ्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी निर्णायक संघर्ष आवश्यक आहे.सध्याची शेतकरी चळवळ याच दुव्याचा भाग आहे. तीनशे शेतकरी बांधव शहीद होऊनही झोपलेल्या मोदी सरकारला उठवण्याची वेळ आली आहे. २६ मार्चला प्रस्तावित शांततापूर्ण आणि गांधीवादी भारत बंदला आमचा पाठिंबा आहे.