जळगाव (प्रतिनिधी) जळगावहून धरणगावकडे जाणाऱ्या कारचा स्टेरिंग रॉड तुटल्याने कार शेतातील झाडावर आदळून झालेल्या अपघातात राज महेंद्र शिरसाठ (वय १९, रा. सार्वे, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी मुसळी ते चिंचपुरा दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील किर्तनकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हृदयपिळवून टाकणारा आक्रोश केला होता.
धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाठ हा आपल्या आई आणि आजी, आजोबांसोबत वास्तव्याला होता. राज हा धरणाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरूवार दि. ४ एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाठ हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे (सार्वेकर महाराज) यांच्यासोबत त्यांच्या (एम.एच. ०९ डी.एक्स. ८९९१) क्रमांकाच्या कारने काही कामानिमित्त जळगावला येण्यासाठी निघाले. मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या कारवरील चालकाने नियंत्रण सुटले, आणि कार सुमारे दहा ते पंधरा फुट उंच उडून शेतातील झाडावर आदळून खाली कोसळली.
जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश !
अपघाताची माहिती मिळताच राज शिरसाठ याच्या नातेवाईकांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. राज शिरसाठ हा आईसोबत मामाच्या गावालाच राहत होता. लहानपणापासून आईसोबत आजी आजोबांसह मामांनी त्याच्या शिक्षणासह संपूर्ण जबाबदारी त्यांनी पुर्ण केल्याने तो सर्वांचाच लाडका होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांसह सर्वांनीच हंबरडा फोडीत आक्रोश केल्याने उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले होते.
ग्रामस्थांच्या मदतीने शिक्षकाने केले रुग्णालयात दाखल !
रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतात चिंचखेडा येथील शाळेतील शिक्षक डी. के. पाटील यांना कारचा अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून जखमींना बाहेर काढत त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत तरुणाला मयत घोषीत केले.
भरधाव कारचा चुराडा !
भरधाव वेगाने जात असलेली कार झाडावर आदळल्याने कारच्या पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. या अपघातात कारमध्ये बसलेला राज शिरसाठ या तरुणाला गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील सार्वेकर महाराज हे देखील गंभीर जखमी झाले.