पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडे गावाच्या पुढील बायपास रस्त्यावर एका कंटेनरने अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या पिकअपला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळा तालुक्यातील बोळे येथील तीन महिलांचा मृत्यू झाला, तर २० जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
पारोळा तालुक्यातील बोळे येथून शिंदखेडा तालुक्यातील चिलानी येथे एका शंभर वर्षीय वृद्धेच्या अंत्यसंस्कारसाठी पिकअप वाहन (क्र. एमएच १८ एम ५५५४) मध्ये २३ महिला व पुरुष जात असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोखंडी रोल असलेला एक कंटेनर (क्र. जीजे १२ बीडब्ल्यू ७२५४) च्या चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पिकअपला जोरदार धडक दिली.
यात रेखाबाई गणेश कोळी (वय ४०), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, रा. बोळे) या जागीच ठार झाल्या, तर चंदनाबाई गिरासे (वय ६५, रा. बोळे) यांना रुग्णवाहिकेतून धुळे येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालावली. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.
एक वाहन रद्द करून दुसऱ्या वाहनाने प्रवास अंत्यविधीसाठी निघालेल्या बोळे येथील नागरिकांनी प्रथम कूझर वाहनाने जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, ते वाहन रद्द करून नंतर बोळे येथून पिकअप वाहनातून २३ जणांनी प्रवास सुरू केला. त्यानंतर अवघ्या अर्धा तासातच हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, १६ चाकी कंटनेर व पिकअप दोन्ही वाहने काही अंतरावर फेकली गेली, तर धुळ्याकडून विनापासिंग वाहनाचीही अपघातग्रस्त वाहनांना धडक बसली. दरम्यान, कंटेनर आणि पिकअप वाहनांची धडक होताच प्रवासी पिकअपमधील २३ जण आजूबाजूला फेकले गेल्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
विचखेडे जवळ झालेल्या या भीषण अपघातात २० जण गंभीररित्या जखमी झाले आहे. यात भरत गिरासे, रणजित गिरासे, राजेश कोळी, भीमकोर गिरासे, भुराबाई गिरासे, रेखाबाई गिरासे, नाना गिरासे, भटा गिरासे, सुनीता गिरासे, धुराबाई गिरासे, अजतसिंग गिरासे, सय्यद लिहायत, हिराबाई गिरासे, भगवान गिरासे, रणजितसिंग गिरासे, रूपासिंग गिरासे, दश्याबाई गिरासे व राजेबाई कोळी असे एकूण २० जण गंभीर जखमी झाले. यातील तिघांना धुळे येथे, तर उर्वरित जखमींना पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.