पुणे (वृत्तसंस्था) पुणे बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार तर 22 जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, बस अर्धी कापली गेली तर ट्रकचा चेंदामेंदा झालाय.
खासगी बस (एमएच ०३ सीपी ४४०९) निता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतूक करणारा मोठा ट्रक (एमएच १० सीआर १२२४) यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरीची पोती होती. रात्री 2:15 च्या सुमारास या दोघांचा भीषण अपघात झाला. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.
यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण 23 जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, 2 मालक असे एकूण 3 जण होते. ट्रकने खासगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातात ट्रकचालकाचा देखील मृत्यू झाला आहे.