शिर्डी (वृत्तसंस्था) चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेच्या मार्गावर तीनदा उलटल्याने झालेल्या अपघातात ३ ठार झाले, तर ३ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिर्डीजवळ हा अपघात झाला आहे.
या अपघातात धरमसिंग काळूसिंग मुसिंगे (वय 52 वर्षे, रा. ता.बदनापूर जि.जालना) राघवेंद्र भरतसिंग परदेशी ( वय 11 वर्षे रा.ता.बदनापूर जि.जालना) आणि राजेंद्र नरसिंगराव राजपूत (वय 48 वर्षे रा.ता.फुलंब्री जि. औरंगाबाद) यांचा मृत्यू झाला आहे. तर चालक भारती (४३, राजेवाडी, ता. बदलापूर, जालना) नंदिनी भरतसिंग परदेशी (४०) शिवम भरतसिंग परदेशी (१६) हे तीन जण जखमी झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार आधी डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर शिर्डीकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर जाऊन दोन ते तीन वेळा पलटी झाली. शिर्डी-भरवीर मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला. कारचा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. अपघाताची महिती मिळताच महामार्गावरील मदत पथक व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना कोपरगाव येथे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, समृद्धीच्या पहिल्या टप्प्यातल्या मार्गावर अपघातांची भीषण मालिकाच सुरू आहे. आता शिर्डीपासूनच्या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यावरही तसेच होणार का?, यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.