भुसावळ (प्रतिनिधी) लेकराबाळांना आई माया अन् बाप शिस्त लावताे. घरातलं त्यांचं वास्तव्य म्हणजे साक्षात विठ्ठल-रुख्माईचं दर्शन घेणं हाेय. उन्हाच्या आंघोळी करून संकटे गिळणारा बाप साहित्यातही दुर्लक्षित राहीला आहे. आता कुठे तरी त्याच्यावर लिहीलं व बाेललं जातेय. बाेलताना, वागताना बापाचा अनादर हाेणार नाही काळजी नव्या पिढीने घ्यायला हवी, असा सल्ला भुसावळचे वक्ते जीवन महाजन यांनी दिला.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय पुष्पा वसंतराव पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय ऑनलाइन पुष्पांजली प्रबाेधनमाला सुरू आहे. त्यात गुरुवारी द्वितीय पुष्प गुंफताना ते बाेलत हाेते. ‘संकटे गिळताे बाप माझा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय हाेता. ज्येष्ठ नागरिक रघुनाथ साेनवणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती हाेती. ही प्रबाेधनमाला म्हणजे संस्कारांची सांस्कृतिक दिंडीच आहे, अशा शब्दात त्यांनी उपक्रमाचे काैतुक केले. सुत्रसंचालन यशदाचे ट्रेनर संजीव भटकर यांनी केले. ऑनलाइन व्याख्यानातून वक्ते जीवन महाजन यांनी माय-बाप, संस्कार, समाज, शिक्षण अशा विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी कवी विशाल देशमुख यांची ‘अख्खा गाव ज्याच्या सावलीत बसत असंत…ते झाड मात्र उन्हात उभं असतं’ ही कविता सादर केली. त्यातून त्यांनी बापाची महती मांडली. बाप वटवृक्षासमान असताे. पण ताे असल्यावर नव्हे, गेल्यावर कळतं. मात्र, घराला मंदिराचं स्वरुप द्यायचं असेल तर मायबापाला विसरू नका. त्यांच्या कष्टाचे माेल ओळखा. पुराण, साहित्यातील बाप समजून घ्या. संकटाच्या छाताडावर चालून जावून कुटुंबाच्या सुखासाठी झटणारा बाप आयुष्य झिजवताे. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्रन् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती. बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही. जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही, असेही ते म्हणाले. उपक्रमाला जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे पाठबळ लाभत आहे.प्रास्ताविक अमित चौधरी यांनी तर आभार प्रा. श्याम दुसाने यांनी मानले. यशस्वीतेसाठी आयाेजन समितीचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
बापावरच्या कवितांनी वेधले लक्ष
आकाशाएवढा माेठा काेण असेल तर ताे आपला बाप असताे. प्रभूरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श नक्कीच डाेळ्यासमाेर ठेवा. पण त्यांना घडवणाऱ्या बापाचेही स्मरण करा, असे आवाहनही वक्ते महाजन यांनी केले. त्यांनी बापावरच्या संग्रहीत कविताही सादर केल्या. त्यातील ‘जन्माला घातलं पण बालपण आईच्या कुशीत गेलं, बापाला वाटूनही झाेपताना मला कुशीत घेता आलं नाही’ ही कविता रसिकांना खिळवून ठेवणारी ठरली. ‘आयुष्यभर ताे माझ्यासाठी झटला, मला माझा बाप देवासारखा वाटला’ या स्वरचित कवितेने त्यांनी व्याख्यानाची सांगता केली.
आज उज्जवला माेरे तृतीय पुष्प गुंफणार
ऑनलाइन प्रबाेधनमालेचे तृतीय पुष्प वाशिमच्या लेखिका उज्ज्वला सुधीर माेरे या शनिवारी सायंकाळी ६ वाजता गुंफतील. ‘मुकी घरे बाेलकी करू या’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे. रसिकांनी अंतर्नाद प्रतिष्ठानच्या समाज माध्यमावरील पेजवर या अाॅनलाइन व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख अमित चाैधरी. समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. साेनवणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.