पुणे (वृत्तसंस्था) ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून एकाने पुण्यातील टेक्स्टाईल डिझायनर असलेल्या तरुणीकडून १० लाख रुपये उकळले आहेत. आरोपीचं नाव अमित चव्हाण असं असून, तो बारामती येथील रहिवाशी आहे. एका सोशल नेटवर्किंग साईटवर आरोपी आणि तरुणी या दोघांची ओळख झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी अमित चव्हाणला बारामतीतून बेड्या ठोकल्या.
अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी आरोपीने तरुणीला केली होती. ‘रॉ’ या तपास संस्थेची नजर असल्याची भीती दाखवत त्याने तरुणीकडून १० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुण्यातील टेक्स्टाईल डिझायनर धनश्री हासे (वय २८) या तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
बारामतीत तरुणाला अटक
चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ३० वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात बारामती एमआयडीसी परिसरात राहतो. एका सोशल नेटवर्किंग साईटवर आरोपी आणि फिर्यादी तरुणी या दोघांची ओळख झाली होती. एप्रिल ते ७ जुलै दरम्यान ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून त्याने तरुणीकडून १० लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.