मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचं नाव देखील न घेतल्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे. यावरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं आहे. “इंदिरा गांधींच नाव घ्यायला भय वाटते? की लाज वाटते की?” अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अग्रलेखात म्हटलं गेलं की, “हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहाल तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे तुकडे करू असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचे साधे नावही घेऊ नये? इंदिरा गांधींचे नाव घ्यायला भय वाटते की लाज वाटते? इंदिरा गांधी यांनी १९७१ चा पराक्रम केला तेव्हा आजचे दिल्लीतील राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील. राज्यकर्त्यांचे मन मोठेच हवे. संकुचित मनाच्या राजाकडून भव्य कामे होत नाहीत. एखाद्या राज्यकर्त्यास मंदिरे बांधता येतील, नद्या साफ करता येतील, इमारती बांधता येतील, पण बांग्लादेश निर्माण करता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी जनरल सॅम माणेकशॉ यांना बोलावून पाकिस्तानात घुसण्याचे आदेश दिले. त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात चाललेल्या अत्याचाराचा परिणाम हिंदुस्थानच्या आर्थिक व्यवस्थेवर, सुव्यवस्थेवर होऊ लागला.
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवायचे ठरविले व सर्जिकल स्ट्राईक वगैरे न करता सरळ हल्लाच केला. पाकिस्तानात सैन्यच घुसवले. हवाई हल्ले केले. नौदलाचा वापर केला. कराची बंदर बेचिराख केले. १६ डिसेंबर १९७१ रोजी हिंदुस्थानी लष्करासमोर पाकिस्तानचे ९०,००० सैन्य शरण आले. १९७१ च्या युद्धातील हिंदुस्थानी सैन्याचा हा पराक्रम ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्या विजयामागची शक्ती इंदिरा गांधींची होती हे विसरून कसे चालेल? अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे.