जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठाकरे गटाने रविवारी शहर पाेलिस ठाण्यात ठिय्या आंदाेलन केले. गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हटल्याचा आराेप करत ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या.
महाप्रबाेधन यात्रेच्या निमीत्ताने शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे तीन दिवस जळगाव दाैऱ्यावर येवून गेल्या. अंधारे यांनी केलेल्या आराेपांसंदर्भात माध्यमांशी बाेलताना पालकमंत्री पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाला ‘सिनेमा’ म्हटल्याने सुषमा अंधारे यांना ‘नटी’ म्हटल्याने महिलांचा अवमान झाल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांविराेधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यासाठी रविवारी दुपारी 12 वाजता ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, महापाैर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वात सुमारे 100 ते 150 शिवसैनिकांनी शहर पाेलिस ठाण्यावर माेर्चा काढला.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महापाैर महाजन, अॅड. ललिता पाटील, गजानन मालपुरे यांच्यासह शिष्टमंडळाने शहर पाेलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी केलेल्या विधानांमुळे महिला वर्गाचा अवमान झाला असून त्यांनी यापुर्वी देखिल असे विधाने केली आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली. परंतु पाेलिसांनी तक्रारीसंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेवून पुढचा निर्णय कळवू असे सांगीतले. त्यामुळे तासाभरानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.