जळगाव (प्रतिनिधी) आशादीप वसातीगृहात कधीही न घडलेल्या घटनेची सत्यता पडताळणी न करता छापिल, चैनल व सोशल मीडियात खोट्या बातम्या प्रसारीत करणाऱ्या, घटनेविषयी काडीचीही माहिती नसताना निवेदनबाजी करणाऱ्या आणि अनधिकृतपणे व्हिडिओ शूट करून गैरप्रचार करणाऱ्यांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करा अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना केली. जळगावला बदनाम करणाऱ्यांना सोडू नका असेही मंत्री पाटील म्हणाले.
जळगावमधील काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आज मंत्री पाटील यांना अजिंठा विश्रामगृहात भेटले. सरिता माळी-कोल्हे, फारूक शेख, सुनील महाजन, शरद तायडे, गजानन मालपूरे, प्रशांत नाईक, अमर जैन, आदींनी त्यांना निवेदन दिले. आशादीप वसतीगृहात काही पोलिसांनी मुलींसह गैरकृत्य केल्याची खोटी बातमी पसरविण्यात आली. तसा प्रकार घडलेलाच नव्हता. अशा खोटी बातमीमुळे पोलिसांची बदनामी झाली. हा मुद्दा घेऊन पोलिस बॉईज संघटनेचे निवेदिता ताठे व फारूक शेख यांनी सुद्धा जळगावची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. जर कारवाई केली नाही तर घेराव करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना गुन्हा दाखल करायची सूचना केली.
त्यावर मुंडे म्हणाले, आम्ही चौकशी समितीच्या अहवालाची प्रत मिळण्याची वाट पाहात आहोत. तो अहवाल मिळाला की, आशादीपची खोटी बातमी देणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करू.
रोहिणी खडसे यांना सुद्धा निवेदन
संध्याकाळी जे डी सी सी बँकेत जाऊन राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे- खेवलकर यांना सुद्धा सरिता कोल्हे, निवेदिता ताठे व फारूक शेख यांनी निवेदन दिले असता त्यांनी सदर तक्रार बाबत सोमवारी प्रत्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून त्यांच्या निदर्शनास सदर घटना आणते व कारवाई करण्याची विनंती करते असे आश्वासन रोहिणी खडसेंनी दिले.
















