मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली आहे. लोकायुक्त सुनावणीत आता हे सिद्ध झालं आहे की, ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी फसवणूक, फॉर्जरी करून रत्नागिरी दापोली येथील समुद्र तटावर १७८०० स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
त्यांनी म्हटलंय की, लोकायुक्तांच्या सुनावणीत हे सिद्ध झालंय की, मंत्री अनिल परब यांनी फसवणूक केली आहे. फसवणुकीने रत्नागिरीमधील दापोली येथील समुद्र तटावर १७८०० स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं आहे. या आरोपानंतर अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या भ्रष्टाचारासंदर्भात लोकायुक्त, राज्यपाल राष्ट्रीय हरीत लवादा, दापोली पोलीस स्टेशन आणि पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार अशा विभिन्न विभागात तक्रार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. असं असूनही अनिल परव यांच्यावर कारवाई कधी होणार? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, “लोकायुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केलं आहे. त्यामध्ये अनिल परब यांच्या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दोन चौकशीमध्ये सुद्धा आढळून आलंय की, नगर रचना विभागान सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही. याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं गेलं होतं, ते पत्र अनिल परब यांचे सहकारी मित्र अधिकाऱ्यांनी महसूल कार्यालयाच्या फाईलमधून गायब केलं होतं” असा आरोप देखील त्यांनी केला आहे. अनिल परब मंत्रिपदावर असताना या प्रकरणाबाबत निर्दोष आणि निष्पक्ष चौकशी होणार नाही.. त्यामुळे अनिल परबांची हकालपट्टी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
















