पुणे (वृत्तसंस्था) कोथरुडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामबाग कॉलनीतील गणेशकुंज सोसायटी येथे उसाच्या रसाचे गुऱ्हाळ चालविणाऱ्या जोडप्याला मारहाण प्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार महिला व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. आपल्याला मारहाण झाल्याने गर्भपात झाल्याचा आरोप पुण्यातील महिलेने केला आहे. कोथरुड पोलिस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. २९ वर्षीय मनिषा भोसले आणि संतोष भोसले यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
कोथरुड भागातील रामबाग कॉलनीत असलेल्या अनधिकृत जागेत ऊसाचे गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास होत असल्याचा दावा गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आता कुलकर्णींवरच मारहाणीचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, जाब विचारल्याच्या रागातून जून २०२० मध्ये पुण्यात कोथरुड परिसरातील सहजानंद सोसायटीजवळ दारु पिण्यास बसलेल्या युवकांनी मेधा कुलकर्णींसह तिघांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती. दारुड्यांनी सुरुवातीला सहजानंद सोसायटीतील रहिवासी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला होता. विलास कोल्हे कुत्र्याला घेऊन बाहेर गेले होते. त्यावेळी दारुड्यांनी आमच्यावर कुत्रा का सोडता, असं विचारत मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार मेधा कुलकर्णी घटनास्थळी आल्या. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला होता. हल्ल्यात कुलकर्णी यांच्या हाताची बोटे फ्रॅक्चर झाली होती.