धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी शहरातील कुरेशी मोहल्ला भागात २० गुरे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा तसेच गोधन गोशाळेतच राहू द्यावे, या मागणीसाठी शनिवारी रात्री न्यायालय उघडले होते. दरम्यान, या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरात व पाळधी दूरक्षेत्र भागात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी ३४ गुरे मिळून आली होती. त्यापैकी २० गुरे धरणगाव शहरात कुरेशी मोहल्ला भागात व १४ गुरे पारधी दूरक्षेत्र हद्दीत आढळून आली होती. सदर गुरांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गोशाळेत टाकण्यात आले होते. परंतू थोड्या दिवसांनी यात राजकीय दबाव सुरु झाला. अगदी गोशाळेला याबाबत एक पत्र देत ही गुरं मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे यांनी याबाबत धरणगाव न्यायालयात अॅड.राहुल पारेख यांच्यामार्फत एक याचिका दाखल केली.
श्रीपाद पांडे यांनी याचिकेत गुरांना गोशाळेतच राहू देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. यानंतर अॅड.राहुल पारेख रात्री दहा वाजेला न्यायालयात गेले आणि त्यांनी न्यायालयाला पटवून दिले की, जर तात्काळ सुनवाई न झाल्यास प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. न्या. एस.डी. सावरकर यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, सुनवाई घेऊन गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिलेत. त्यामुळे आता पुढील आदेश होईपर्यंत पोलिसांना गुरे गोशाळेतच राहू द्यावी लागणार आहेत. याबाबत पुढील सुनवाई आज ऑगस्ट रोजी होणार होती. परंतू पोलिसांनी आज न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासह पशुधन गोशाळेत ठेवल्याची माहिती न्यायालयाला दिली. याचिकेतील दोन्ही मागण्या यामुळे आपसूकच पूर्ण झाल्यात.
धरणगाव पोलिसांनी संबंधित गुरांसंदर्भात गुन्हा दाखल केल्याची प्रत सादर केल्याने युक्तिवाद करण्याची गरज पडली नसल्याने अॅड. राहुल पारेख यांनी सांगितले. तर संबंधित बेवारस गुरांसंदर्भात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित जनावरेही गोशाळेमध्ये तूर्त हलवण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दिली. दरम्यान, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळते.