नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयकर विभागाने करदात्यांना कर भरण्यास अधिक सोपे जावे, यासाठी नवीन वेबसाइट सुरू केल्यानंतर या वेबसाइटमध्ये अनेकविध तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं असून समन्स बजावलं आहे.
इन्फोसिसने ई फाइलिंगच्या नवीन पोर्टलचे डिझाइनिंग केले होते. ७ जून रोजी पोर्टल लाँच केल्यानंतर त्यात अनेक समस्या येत होत्या. मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट्स ट्विटर देखील त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत ट्विट करत होते. प्रोफाइल किंवा पासवर्ड बदलणे यांसारख्या साध्या गोष्टीसाठी देखील त्यांना अडचणी येत होत्या. पोर्टलवर येणारे अडथळे लवकरच दूर करुन पोर्टल व्यवस्थित काम करेल असा दावा इन्फोसिसकडून करण्यात आला होता. मात्र अनेक महिन्यांनंतरही पोर्टलवरच्या अडचणी दूर झाल्या नाहीत. त्यामुळे इन्फोसिसच्या सीईओ आणि एमडी सलील पारेख यांना केंद्रीय वित्तमंत्रालयाकडून समन्स पाठवण्यात आले आहे.
ई फाइलिंग पोर्टलबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण जून महिन्यापासून चिंतेत होत्या. इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांशी देखील याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्याच्यासोबत तत्कालीन अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर, राजस्व सचिव तरुण बजाज आणि अर्थ मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.