ठाणे (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्राला तडाखा दिला असतानाच दुसरीकडे पुन्हा एक आघात झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये १४ तर अतिदक्षता विभागात (ICU) सहा रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली. यास्मिन शेख ( ४६ वर्षे), नवाब शेख (४७ वर्षे), हलिमा सलमानी (७० वर्षे), हरीश सोनावणे (५७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्कजवळील हसन टॉवरमध्ये प्राईम क्रिटीकेअर रुग्णालय आहे. पहाटे पावणे चारच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्शिमन दलाने ही आग विझवली. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
या रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त इतर व्याधी असणारे रुग्ण उपचार घेत होते. राज्यात मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात आग लागण्यासह इतर दुर्घटना घडल्या आहेत. भंडाऱ्यातील घटनेपासून हे सत्र सुरू असून, नागपूरमध्ये एका रुग्णालयाला आग लागून दहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर त्यापाठोपाठ मुंबईतही आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.