जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणेश मार्केटमध्ये साड्या आणि कपडा दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत एक दुकान पूर्णतः खाक झाले असून इतर २ दुकानांना झळ पोहचली आहे. दरम्यान, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहरातील केळकर मार्केटनजीक गणेश मार्केट असून याठिकाणी राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे सारिका साडीया, सारिका टॉप, सारिका टेक्सटाईल हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता या दुकानांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कापडांची दुकानं असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. परिणामी दुकानातील साडी तसेच ड्रेस मटेरियल जळून खाक झाले. गणेश मार्केट येथे भीषण आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, एवढी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवताना अपयशच येत होते. तर आगीचे लोळ हे तिसऱ्या मजल्या पर्यंत जात होते.
इतर दुकानांना बसली आगीची झळ
तब्बल एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाला होता. दुसरीकडे आगीने इतर दुकानही आपल्या कचाट्यात घेतले होते. त्यामुळे मार्केटमध्ये व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आपल्या दुकानात आग तर लागली नाही, काही साहित्य तर जळाले नाही याची शहानिशा करण्यासाठी व्यापारी बांधवांची धावपळ सुरू होती. मार्केटमधील व्यापाऱ्यांचा होलसेलचा व्यवसाय असल्यामुळे दुकानाच्या बाहेर मालाचे गठ्ठे ठेवले होते. या गठ्ठे देखीलजळून खाक झाली आहे. घटनास्थळी पोलिस देखील दाखल झाले होते.